Loksabha : ‘रासप’ शनिवारी करणार आपली भूमिका स्पष्ट

मुंबई : पोलीसनाा ऑनलाईन – राज्यात सत्तेत असलेल्या भाजप शिवसेना युतीसोबत राष्ट्रीय समाज पक्षाने लोकसभा निवडणूकीत दोन जागा मागितल्या आहेत. यावर युतीकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा निवडणूकीतील आपली भूमिका शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात स्पष्ट करणार असल्याचे रासपच्यावतीने सांगण्यात आले आहे.

रासपने युतीकडे दोन जागांची मागणी केली आहे. मात्र, यावर अद्याप काहीही उत्तर युतीकडून मिळाले नाही. त्यामुळे दोन दिवसांत आमची भूमिका स्पष्ट करू असे, रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी म्हटले आहे. तसेच लोकसभेच्या दोन जागांसाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत. भाजपदेखील रासपची मागणी पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करताना दोडतले यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी रासपचा पुण्यात कार्यकर्ता मेळावा आहे, या मेळाव्यात पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचे दोडतले यांनी कळविले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजप आणि शिवसेना पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली आहे. मात्र, यात घटकपक्षांना जागा देण्याचे अद्याप कुठेही म्हटले नाही. याआधी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी देखील भाजपकडे एक तरी जागा देण्याची मागणी केली आहे. परंतु, भाजपने या मागणीला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे कळते. त्यामुळे रासपच्या मागणीवर भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.