‘खलनायक’ संजय दत्त हि लोकसभा निवडणूक लढवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात गोंगावात असतानाच संजय दत्त देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. संजय दत्तची बहीण प्रिया दत्त मुंबई मधील काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत. हे आता स्पष्ट झाले असताना संजय दत्त हि निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

राज्यसभेचे खासदार आणि मुलायमसिंह यांचे एकेकाळचे निकटवर्तीय अमर सिंह यांच्या आग्रहावरून संजय दत्त यांनी समाजवादी पक्षात २००९ साली प्रवेश केला होता. त्यानंतर आत्ता संजय दत्त यांना समाजवादी पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशाच्या गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून संजय दत्त लोकसभेचे समाजवादी पक्षाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. २००९ साली समाजवादी पक्षाकडून संजय दत्त यांच्या उमेदवारीची घोषणा देखील करण्यात आली होती. परंतु संजय दत्त त्यावेळी निवडणुकीला सामोरे जाऊ शकले नाहीत.

दरम्यान अमरसिंह यांच्या समाजवादी पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठी नंतर संजय दत्त देखील समाजवादी पार्टी सोडतील अशा अटकळी लावल्या होत्या. मात्र त्यांनी सपाची साथ सोडली नाही. म्हणून त्यांना पक्षाकडून बक्षिशी म्हणून लोकसभेची उमेदवारी देण्याचा सपाने निर्णय घेतला आहे. संजय दत्त यांना उमेदवारी दिल्यास गाझियाबादचे खासदार आणि केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांना तगडे आव्हान उभा राहू शकते.