दुश्मनी जमकर करो, लेकिन… सुषमा स्वराज यांनी ममता बॅनर्जींना सुनावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेनंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधानांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून ममता बॅनर्जी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ममता बॅनर्जी यांना खडे बोल सुनावले आहेत.

सुषमा स्वराज यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे की, ‘ममता जी, आज तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या आहेत. ‘तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदी जी हे देशाचे पंतप्रधान आहेत. उद्या तुम्हाला त्यांच्याशीच जुळवून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला बशीर बद्र यांच्या एका शायरीची आठवण करून देते – दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों. ‘

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी –

‘मोदी हे दुर्योधन आणि रावणाचा अवतार आहे. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते. निवडणूक आल्या की मोदींचा रामनामाचा जप सुरू होतो पण त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान मी आजवर पाहिला नाही. मोदींनी ५ वर्षांत ‘अच्छे दिन’ आणण्याच्या गोष्टी केल्या होत्या. परंतु, नंतर त्यांनी नोटाबंदी केली. ते संविधान सुद्धा बदलणार आहेत. भाजपच्या घोषणांवर माझा तिळमात्र विश्वास नाही. मी प्रचंड संघर्ष केला. पण स्वत:ला विकून किंवा स्वत:चं मार्केटिंग करून राजकारण केलं नाही. संघर्षमय जीवन जगत असल्यानेच मी मोदींना घाबरत नाही.’