‘त्या’मुळे महाराष्ट्रातील राजकीय हवा बदलताना दिसते : शरद पवार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्या आयुष्यात मी अनेक निवडणुका पहिल्या. मात्र हि अशी निवडणुक आहे की ज्यामध्ये पंतप्रधानांना दर दोन – तीन दिवसांनी महाराष्ट्रात यावं लागतंय. यापूर्वीचे पंतप्रधानही यायचे मात्र ते एक -दोन वेळेसच यायचे. यावरून महाराष्ट्रातील राजकीय हवा बदलात असल्याचे दिसत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हंटले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदानही पूर्ण झालेले आहे. यादरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदार संघात आयोजित पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी सरकारने २०१४ च्या निवडणूकीत दिलेली आश्वासने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळे रोज एक प्रचाराचे मुद्दे बाहेर काढत आहेत. व्यक्तीगत हल्ले करून त्यातून प्रतिसाद मिळत नसल्याने आता त्यांनी काश्मिरमध्ये कॉँग्रेस फुटीरवाद्यांसमवेत गेल्याची टीका करत आहेत. त्यांच्या टीकेचा रोक जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे आहे, पण ते आमचे घटकपक्षच नाहीत. असे शरद पवार यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, भाजपच त्यांच्यासमवेत सरकारमध्ये होते. मोदी यांनी तीन-चार वर्षापुर्वी काश्मिरच्या विकासाचा चांगला कार्यक्रम मांडला होता. त्यामुळे त्यांचे स्वागतही करण्यात आले होते. पण त्यातील एकाही गोष्टीची अंमलबजावणी झाली नसल्याने येथील तरूण पिढी संतप्त आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, भाजप सरकारने राफेल विमान खरेदी मध्ये तीन दर सांगितले. संयुक्त संसदीय समितीतर्फे या व्यवहाराची मागणी विरोधकांनी धरली. यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे. याची कल्पना दिवंगत मनोहर पर्रिकरांना होती. त्यामुळेच त्यांनी देशाचे संरक्षण मंत्री पद सोडून गोव्याचे मुख्यमंत्री झाले. असेही त्यांनी म्हंटले.

यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी बाबतही भाष्य केले. पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय आहे ते माहिती नाही, त्यामुळे त्याचा फटका कोणाला बसेल हे आता सांगता येणार नाही. मात्र मतविभागणी करण्यासाठी काही मंडळींनी जाणीवपुर्वक केलेला हा कार्यक्रम असू शकतो असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवत नाहीत तरीही ते सभा घेत आहेत. असा प्रश्न त्यांना विचारला असता, नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटविण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत, विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते. असेही त्यांनी म्हंटले.