काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांचा एक पाय तुरुंगात असल्याचे विसरू नये : उद्धव ठाकरे

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – साठ वर्षे खाऊन ज्यांची पोटं भरली नाहीत त्यांनी या देशावर केवळ दरोडे टाकण्याचे काम केले. अनेक घोटाळे केले. स्वतः दरोडेखोर आणि दुसर्‍याला चोर म्हणणार्‍यांचा एक पाय तुरुंगात आहे हे त्यांनी विसरू नये अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच आम्ही राम मंदिर बांधणारच, असे आश्वासनही त्यांनी दिले. महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

आमच्याकडे खुर्चीसाठी कोणी भुकेला नाही –

आघाडीवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘आज राज्यात अनेकजण आमच्या समोर उभे ठाकले आहेत. आम्ही युती केल्याने त्यांना असुया आली आहे. मध्यंतरी आम्ही भांडत आहोत हे बघून ते खूष होते. सत्तेवर जायचं आणि कसं खायचं हे त्यांच्याकडून शिकायचे. हे स्वतः दरोडेखोर आणि दुसर्‍यांना चोर बोलतात. यांना हे बोलायचा नैतिक अधिकारच नाही. साठ वर्षे खाऊन ज्यांची पोटं भरली नाहीत त्यांनी या देशावर केवळ दरोडे टाकण्याचे काम केले. अनेक घोटाळे केले. घोटाळ्यांची बाराखडी देखिल कमी पडेल. स्वतः दरोडेखोर आणि दुसर्‍याला चोर म्हणणार्‍यांचा एक पाय तुरुंगात आहे हे त्यांनी विसरू नये. आम्ही कोकणात विकासकामे केली आणि समोरचा विचारतोय काय विकास केलात. ज्याला ही विकासकामे दिसत नसतील तोच उद्याच्या निवडणुकीनंतर दिसेनासा होईल’. आम्ही कोकणाला जो शब्द दिला तो पाळला नसता तर आज हा विराट जनसमूदाय दिसला नसता. आज इथे बसायला जागा नाही. सच्चे कार्यकर्ते आज उन्हात उभे आहेत. आमच्याकडे खुर्चीसाठी कोणी भुकेला नाही.’

आम्ही राम मंदिर बांधणारच-

याच सभेत राम मंदिराविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘महायुतीच्या जाहिरनाम्याबाबत बोलताना आमचा जाहिरनामा बघा आणि त्यांचा बघा. राहुल गांधी सगळीकडे फिरताहेत. वायनाडला ते लुंगी घालून फिरले आता त्यांना मंदिरे दिसली. निवडणूक आल्यावर सोनियांना होम हवन करावासा वाटला. आता त्यांना हे सुचलं? मग ते राम मंदिर बाबत का बोलत नाहीत. आमच्या जाहिरनाम्यात राम मंदिराचं आश्‍वासन आहे आणि आम्ही राम मंदिर बांधणारच.’

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत आणि काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यात लढत होत आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते.२००९ मध्ये ते निवडूनही आले होते. २०१४ विनायक राऊत यांनी त्यांचा प्रभाव केला होता. मात्र आता राणे काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.