समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान : वरुण गांधी

पिलीभित : वृत्तसंस्था – महागठबंधन पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करत आहेत. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान असं वक्तव्य भाजप नेते वरुण गांधी यांनी केले आहे. पिलीभितमध्ये एका प्रचार सभेत ते बोलत होते.

वरुण गांधी म्हणाले की, ‘तुम्ही महागठबंधनला मतदान करणार असाल, तर ती सर्व मंडळी पाकिस्तानची आहेत. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान. तुम्ही भारतासोबत आहात की पाकिस्तानसोबत. त्यामुळे पाकिस्तानऐवजी भारतमातेसाठी मतदान करा. ‘

दरम्यान, यापूर्वीही वरूण गांधी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मी संजय गांधींचा मुलगा आहे. अशा माणसांना मी माझ्या बुटाची लेस सोडायला ठेवतो. मी इथे तुमच्यासमोर उभा आहे आणि माझ्या उपस्थितीत कोणीही तुम्हाला काहीही बोलण्याची हिंमत दाखवू शकत नाही,’ असं वादग्रस्त विधान उत्तर प्रदेश मधील एका प्रचार रॅलीला ते संबोधित करताना वरुण गांधींनी केलं होतं.

वरुण गांधी यावेळी पिलीभित मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याआधी २००९ मध्ये त्यांनी पीलीभीतमधूनही निवडणूक लढवली होती. वरुण गांधी गेल्या निवडणुकीत सुलतानपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांचा मतदार संघ बदलण्यात आला आहे. सुल्तानपूर येथून त्यांची आई मेनका गांधी यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे.