Opinion Poll : ‘एनडीए’ बहुमतापासून दूर, पण सत्तेच्या जवळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाची खरी ताकद उत्तर भारतात असून या भागातच भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. देशात २०१४ मधील मोदी लाटेचा परिणाम कमी झाला असल्याचा अंदाज एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. त्यात उत्तर भारतात भाजप व मित्र पक्षांच्या तब्बल ५७ जागा कमी होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात ७ जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीएला एक हाती सत्ता आणण्यासाठी चांगलीच दमछाक होणार असल्याचा अंदाज या ओपिनियन पोलमधून दिसून आला आहे.

महाराष्ट्रात युतीला २०१४ मध्ये ४२ जागा मिळाल्या होत्या. आता त्यांच्या जागा ३५पर्यंत खाली येणार आहे. या सर्व्हेत महाराष्ट्रात काँग्रेसला ८ तर राष्ट्रवादीला ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला २१ तर शिवसेना १४ जागांवर विजयी होऊ शकते, असा अंदाज आहे.

भाजपच्या जागा कमी होणार असल्यातरी देशात सर्वाधिक २२२ जागा भाजपला मिळणार असून दुसऱ्या स्थानी काँग्रेस पक्ष ९१ जागांसह असणार आहे. डीएमकेला २७ जागा मिळण्याची शक्यता असून तो पक्ष तिसऱ्या स्थानी असेल. भाजप व मित्रांना मिळून २६७ जागा मिळण्याची शक्यता असून ते बहुमतांपासून काही जागा दूर राहण्याची शक्यता आहे. आता एनडीएच्या ३३६ जागा आहेत. त्यांची २६७ पर्यंत घसरण होऊ शकते. त्यात अर्थात सर्वाधिक ५१ जागा भाजपच्या कमी होत आहे. सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसण्याची शक्यता आहे. या ८० जागांपैकी एनडीएला केवळ ३२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. येथे ४१ जागांचा फटका भाजपला बसणार आहे. नितिश कुमार यांच्याबरोबर युती केल्याने बिहारमध्ये भाजपच्या स्वत:च्या जागा कमी झाल्या तरी एनडीएच्या जागा वाढणार आहेत. उत्तर भारतातील अन्य सर्व राज्यात कमी जास्त फरकाने भाजपला फटका बसणार आहे.

काँग्रेस व मित्र पक्षांना १४२ जागा मिळण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये युपीएला केवळ ६९ जागा मिळाल्या होत्या. इतर पक्षांना १४३ जागा मिळू शकतील. छत्तीसगड, झारखंडमध्ये भाजपला सर्वाधिक फटका बसणार असून २०१४ मध्ये राज्यातील सर्व जागा मिळविणाऱ्या भाजपच्या गुजरात, राजस्थानमधील जागा कमी होणार आहेत.

उत्तर भारतातील हा मुड लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले लक्ष पं. बंगाल, ओरिसा या राज्यांमध्ये अधिक लक्ष घातले असून तेथे जास्तीतजास्त जागा मिळवून ही कसर भरुन काढण्याचा प्रयत्न आहे.

You might also like