..तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात दंगली होतील

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएनं केला आहे. आता पूर्ण जगाचं लक्ष भारतातल्या लोकसभा निवडणुकांवर राहणार आहे. कारण  लोकसभा निवडणुकीलाही काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. शिवाय भारतात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अशातच आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं एक खळबळजनक दावा केला आहे.
सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी हा अहवाल तयार केला आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला आहे. अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे की, भाजपानं निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर जोर दिल्यास देशात सांप्रदायिक दंगली भडकण्याची शक्यता आहे. असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर पुढे गेल्यास भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगली होतील. अमेरिका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हा अहवाल प्रसिद्ध करते. ज्यात देशभरातील घटनांचं मूल्यांकन केलेलं असतं. यात या दंगलीविषयीचा दावा करण्यात आला आहे.
या अहवालाबाबत बोलताना कोट्स म्हणाले, “मोदींच्या कार्यकाळात भाजपाशासित राज्यांमध्ये सांप्रदायिक वाद विकोपाला गेला आहे. भाजपा सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांनी हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर जोर देत हिंसाचार केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचा हिंसाचार झाल्यास दहशतवादी संघटनांना दृष्कृत्य करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे” असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.