गांधी घराण्यातील ‘ही’ व्यक्ती लढवणार मोदींच्या विरोधात निवडणूक ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या प्रभारी प्रियंका गांधी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवू शकतात. एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. प्रियंका गांधींनी आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सांगितले आहे. यावर अंतिम निर्णय राहुल गांधी आणि सोनिया गांधी घेणार आहेत.

महासचिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रियंका यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय भाग घेतला आहे. राज्याच्या विविध भागात त्यांचे प्रचार दौरे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदींविरुद्ध निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने महाआघाडीत काँग्रेसला स्थान दिलेले नाही. त्यांनी काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन जागा सोडल्या आहेत. महाआघाडीत स्थान न मिळाल्याने काँग्रेसने प्रियंका यांना राजकारणात उतरवले.

प्रियंका यांनी महासचिवपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर बनारसचा दौरा केला. त्यांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबाची भेट घेतली. प्रियंका गांधी निवडणूक लढवणार का, अशी चर्चा सुरू झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना आपचे संयोजक आरविंद केजरीवाल यांनी वाराणसीत आव्हान दिले होते. या निवडणुकीत मीदींनी ३ लाख ७१ हजार ७८४ मतांनी विजय मिळवला होता.