मोदींविरोधात लढणाऱ्या ‘त्या’ उमेदवाराची अखेरची लढाई संपली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाराणसी मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिलेले बीएसएफच बरखास्त जवान तेज बहाद्दूर यादव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक आयोगाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.

तेज बहाद्दूर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, हा दावा दाखल करून घेण्याइतपत गुणात्मक दर्जा आढळत नाही असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता मोदींच्या विरोधातील तगडा उमेदवार समजल्या जाणाऱ्या तेज बहादूर यांना उमेदवारी मिळण्याची शेवटची संधी सुद्धा आता संपली आहे.

तेज बहादूर यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की, ते निवडणुकीला कोणत्याही प्रकारे आव्हान देत नाही आहेत. आमचे म्हणणे केवळ इतकेच आहे की, त्यांची उमेदवारी गैरपद्धतीने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, १९ मेची निवडणूक लढण्याची परवानगी त्यांना देण्यात यावी. तसेच उमेदवारी रद्द झाल्यानंतर आम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी योग्य संधी देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजपने कोटींची ऑफर दिल्याचा दावा

तेज बहाद्दूर यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केला होता. “मोदींविरोधात निवडणूक न लढण्यासाठी मला भाजप नेत्यांकडून ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचे बहाद्दूर यांनी म्हंटले होते. याबाबत बोलताना तेज बहाद्दूर यांनी म्हंटले आहे की, ” निवडणूक न लढवण्यासाठी भाजप नेत्यांनी माझ्यावर मोठा दबाव टाकला होता.

विशेष म्हणजे मला ५० कोटी रुपयांची ऑफर देखील देण्यात आली होती. असे आरोप तेजबहाद्दूर यांनी केले होते. यावेळी ज्यांनी ऑफर दिली त्यांची नवे सांगा असे विचारल्यानंतर बहाद्दूर म्हणाले, ‘ ते खूप घातक लोकं आहेत. मी जर त्यांचे नाव जाहीर केले तर मला ठार मारण्यात येईल”. असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते .

दरम्यान वाराणसीमध्ये १९ मे रोजी मतदान होणार आहे. तेज बहादूर यादव यांनी २९ एप्रिल रोजी समाजवादी पार्टीकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.