‘सोमय्यांना शिवसेनेचा विरोध नव्हता’ : संजय राऊत यांचा ‘यू टर्न’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध नव्हता असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सोमय्यांची उमेदवारी हा भाजपाचा अंतर्गत मुद्दा आहे असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी केलेल्या शिवसेनेवरील जाहीर टीकेमुळेच त्यांना उमेदवारी नाकारत त्यांचा पत्ता कट केला आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध नव्हता असं आता राऊत म्हणत आहे.

शिवसेनेच्या विरोधामुळेच किरीट सोमय्या यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही अशी सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध नव्हता. तो भाजपाचा अंतर्गत मुद्दा आहे, असं राऊत म्हणाले. सोमय्या यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभागी होऊ नये, ही शिवसैनिकांची भावना असली तरी ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाचे म्हणजे संजय राऊत यांनी वेळोवेळी सोमय्या यांच्या उमेदवारीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सोमय्या यांना उमेदवारी दिली जाऊ नये असा पवित्रा त्यांनी घेतला होता. यापूर्वी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, “सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल ज्या प्रकारची वक्तव्यं केली, ती योग्य नव्हती. टीका करण्यास हरकत नाही, पण आपण कोणत्या भाषेचा वापर करता याचाही विचार करायला हवा होता. कोणत्या मर्यादेपर्यंत टीका करावी हे आधीच ठरवलं पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी भरपूर त्रास दिला. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना शांत केलं आहे. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपाचे दिल्लीतील नेते घेतील” असं संजय राऊत यांनी 29 मार्च रोजी म्हटलं होतं.

इतकेच नाही तर, जर त्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात अपक्ष लढू अशी राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी जाहीर केले होते. संजय राऊत यांनी त्याचं समर्थनही केलं होतं.