हिंगोली जिल्ह्यात कोंबडी आणि दारूसाठी निवडणुक कर्मचाऱ्यांचा गोंधळ

सेनगाव : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी गेलेल्या मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी कोंबडी आणि दारूसाठी रात्री गोंधळ घातला. तसेच सकाळी मतदानासाठी आलेल्या लोकांना काय भाजीपाला घेऊन आला का, या गावाचे काही खरे नाही, असे टोमणे मारले. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करीत मतदानावरच बहिष्कार टाकला.

साबलखेडा येथे लोकसभा निवडणुकीसाठी चार शिक्षक व एक पोलीस असे एकूण पाच कर्मचारी नियुक्त केले होते. हे कर्मचारी १७ एप्रिल रोजी साबलखेडा येथे मुक्कामी गेले होते. गावातील रेशन दुकानदार संतोष देवराव भिसे यांनी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. वरण-भात-भाजी-पोळी असा पाच कर्मचाऱ्यांचा डबा स्वत: नेऊन दिला होता. परंतु मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था झाले नसल्याचे पोलीस ठाण्याला कळवले होते. पोलिसांनी सावखेडा येथील समीर भिसे यांना फोन करुन विचारणा केली. सरपंचाचे पती समीर भिसे यांनी संतोष भिसे यांना जेवणाच्या व्यवस्थेबाबत विचारले असता त्यांनी जेवणाचे डबे रात्री ८.३० वाजताच दिल्याचे सांगितले. नंतर संतोष भिसे सेवक चीनकुजी खरात, मारुती दत्तराव भिसे सह काही ग्रामस्थ विचारपूस करण्यासाठी गेले असता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या साध्या जेवणाबाबत नाराजी व्यक्त करीत कोंबडीच्या मटणाची भाजी आणि दारूची व्यवस्था का केली नाही ? असे म्हणून नशत तर्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ केली. त्यानंतर १८ एप्रिल रोजी सकाळी मतदान कक्षात गेलेल्या बुथ एजंटना सुद्धा काय भाजीपाला न्यायला आले काय ? तुमच्या गावाचे काय खरे नाही. असे म्हणत कर्मचाऱ्यांनी टोमणे मारले. आधीच रात्री घडलेल्या प्रकारामुळे नाराज झालेल्या सावरखेडा येथील ग्रामस्थांना याची माहिती मिळाल्यावर ते संतप्त झाले.

मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मतदान न करण्याचा पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार टाकला होता. याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, सेनगावचे नायब तहसीलदार भोजने यांना मिळताच त्यांनी मतदान केंद्राला भेट दिली. ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच तक्रार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास गोरेगाव येथे पाठवून दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला साबलखेडा येथे नियुक्त केले. तसेच लेखी तक्रार करा यानंतर निवडणूक आयोग कर्मचाऱ्यावर कारवाई करील असे सांगून ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर तब्बल सव्वा दोन तासानंतर सव्वा नऊ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like