आम आदमी पार्टीला मोठा धक्का ; खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी सर्वच राजकीय पक्षातले नाराज नेते पक्ष बदलत आहेत. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची सख्या जास्तच आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे नाराज खासदार हरिदर सिंह खालसा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. खालसा यांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जुने नाते आहे.

हरिदर सिंह खालसा यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश झाला. दिल्लीमध्ये सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे लोकसभेचे चार खासदार आहेत. हे चारही खासदार पंजाब राज्यातून निवडून आले आहेत. हरिदर सिंह खालसा यांना आम आदमी पक्षाने निलंबित केले आहे.

भाजपात प्रवेश केल्यानंतर हरिंदर सिंह खालसा म्हणाले की, सध्या भारतीय जनता पार्टी हा एकच पक्ष देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात आहे. बाकी सगळे पक्ष सत्तेसाठी लाचार आहेत. मी कोणत्याही अटींशिवाय भाजपात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचा माझ्यावर प्रभाव पडला आहे. 1974 च्या बॅचमधील ते आयएफएस अधिकारी होते. 1984 मध्ये पंजाबमध्ये सिखविरोधी दंगल झाली होती त्याच्या निषेधार्थ हरिंदर यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता.

हरिंदर सिंह खालसा यांचे वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे सहकारी होते. 1996 मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेत निवडून आले. तर 2014 मध्ये फतेहगड लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीकडून हरिंदर सिंह यांनी निवडणूक लढवून जिंकून आले. राजकारणात येण्याआधी हरिंदर सिंह खालसा नार्वेमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करत होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं विधान केले होते.