साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्याला मोदींच्या ‘या’ मंत्र्याने दिलं समर्थन

बंगळुरू : वृत्तसंस्था – ‘नथुराम गोडसे देशभक्तच होता व देशभक्तच राहील. जे गोडसेला दहशतवादी संबोधतात, त्यांनी स्वतःचा विचार करावा, असे वक्त्यव्य करून साध्वी प्रज्ञा यांनी खळबळ उडवून दिली होती. भाजपने देखील त्यांच्या या वक्तव्याशी आमचा काहीही संबंध नाही असे काल म्हटले होते. दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या या वक्तव्याचं भाजपच्या आणखी एका नेत्यानं समर्थन केलं आहे. ‘साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे,’ असं भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं आहे. यामुळे भाजप पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या वक्तव्यावर साध्वी प्रज्ञासिंग यांनी माफी देखील मगितली आहे.

पुढे बोलताना अनंतकुमार हेगडे म्हणले कि, साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागण्याची गरज नाही. ७० वर्षानंतरही आजची पिढी याबाबत बोलते याबद्दल मला आनंद वाटतो. गोडसे यांच्या आत्म्यालाही समाधान, आनंद मिळत असेल. भाजपने याविषयी प्रज्ञा सिंग यांना माफी मागायला सांगितली होती आणि त्यांनी ती मागितली देखील होती. मात्र आता मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याने असे वक्तव्य केल्याने पुन्हा वादंग उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, याआधी देखील साध्वी प्रज्ञा सिंग यांनी हेमंत करकरे आणि नथुराम गोडसे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.