शिवसेना-भाजपा युतीत घटकपक्ष रिपाई-रासपला एकही जागा नाही ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा केली आहे. मात्र युतीतील घटक पक्ष अद्याप युतीच्या प्रचारापासून दुरच आहेत . रामदास आठवले यांच्या रिपाईला आणि महादेव जानकर यांच्या रासपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून जागा सोडण्यात येणार नाही अशी माहिती मिळाली आहे.

भाजपच्या एका मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत नव्हे तर विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाचा विचार केला जाईल. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीत घटकपक्ष वंचितच राहणार असून युतीत रिपाई-रासपला एकही जागा मिळणार नाही अशीच शक्यता दिसत आहे.

युती नंतर शिवसेना-भाजपचा रिपाईवर अन्याय

भाजपाने युतीची घोषणा केली. मात्र यावेळी आम्हाला विश्वासात घेतले नाही, त्यामुळे त्यांनी आता मनाचा मोठेपणा करून आमच्यासाठी एक जागा सोडावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली मात्र त्याला युतीकडून प्रतिसाद फारसा मिळाला नाही.
रासपने भाजपकडे परभणी, माढा किंवा बारामतीपैकी एक जागा द्यावी अशी मागणी केली होती. मात्र भाजपने ती फेटाळून लावली आहे. मात्र बारामती जागेवर महादेव जानकर यांना निवडणूक लढायची असल्यास त्यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढावी असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र महादेव जानकर कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार नाहीत. त्यामुळे बारामती जागेबाबत भाजपाकडून जानकरांना नकार दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

एका जागेसाठी युती सोडणार नाही : रामदास आठवले

मागील पाच वर्षामध्ये मोदी सरकारने अनेक बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. दलितांचे आरक्षण, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे स्मारक हे प्रश्न मोदींनी सोडवले आहेत. त्यामुळे एखाद्या जागेसाठी हट्ट करण्यापेक्षा आरपीआयला राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद आणि कार्य़कर्त्यांना महामंडळावर घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एखाद्या जागेसाठी युती तोडणे योग्य नसल्याची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.