सोनिया गांधी यांच्या पराभवासाठी भाजपने आखली नवीन रणनीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशातील ७० पेक्षा अधिक खासदार जिंकून मोठा विक्रम केला होता. मात्र आता भाजपच्या बाजूने तसे जनमत राहिले नाही. म्हणून भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात देखील विजयासाठी जोर लावायला सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभा निवडणूक लढत आहेत. तो त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या ठिकाणी भाजपने कोणाला उमेदवारी द्यायचे हे निश्चित केले नसले तरी या ठिकाणी लढण्यास अनेक भाजपचे नेते इच्छुक आहेत. या मतदारसंघात ब्राह्मण आणि अग्रवाल मतदार जास्त असल्याने भाजप या जागी अजय अग्रवाल यांना उमेदवारी देण्यास अनुकूल आहे. त्यांचेच नाव सध्या आघाडीवर असल्याचे चित्र रायबरेली मतदारसंघातून दिसते आहे.

रायबरेली मतदारसंघ स्वातंत्र्यापासून काँग्रेसच्या ताब्यात राहिलेला मतदारसंघ जरी असला तरी त्या ठिकाणी तीन वेळा काँग्रेसचा पराभव झाला आहे. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजनारायण या मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. त्याच प्रमाणे १९९८ आणि १९९९ साली अशोक सिंह हे भाजपचे नेते रायबरेली मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. सध्या भाजपकडून या मतदारसंघात अजय अग्रवाल, दिनेश प्रताप सिंह यांच्यासह अमर सिंह, कुमार विश्वास यांच्या नावाची देखील चर्चा आहे. तसेच नवी दिल्लीच्या जागी गौतम गंभीर यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने नवी दिल्लीच्या विद्यमान खासदार मिनाक्षी लेखी यांच्या देखील नावाची चर्चा रायबरेली मतदारसंघासाठी केली जाते आहे.