मोदींच्या नावाने कुणी मत मागायला आलं तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा

बेंगळुरू : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. जनता दल संयुक्त (जेडीएस) चे आमदार शिवालिंग गौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच मोदींच्या नावाने कुणी मत मागायला आलं तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा, असंही विधान त्यांनी केलं आहे.

गेल्या निवडणुकीत मोठी आश्वासने मोदींनी दिली होती. मात्र त्यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याचे शिवालिंग गौडा यांनी म्हणत भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. मात्र, बोलताना त्यांची जीभ घसरली. रविवारी आरासिकेरे येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना शिवालिंग गौडा म्हणले की, मोदींनी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली का ? मोदी स्विस बँकेत ठेवलेला काळा पैसा परत आणू शकले नाहीत आणि त्यांनी १५ लाख देण्याचं वचनही निभावलं नाही. जो कोणी भाजपा नेता प्रचारादरम्यान तुमच्याजवळ येईल त्याला पहिला प्रश्न हा विचारा. यानंतर जर कुणी तुमच्याकडे मोदीनामाचा जप करत मत मागायला आलं तर त्याच्या कानाखाली आवाज काढा.

‘दरम्यान, भाजपा प्रवक्ते आणि आमदार सुरेश कुमार यांनी शिवालिंग गौडा यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. सुरेश कुमार म्हणाले की, ‘गौडा मोदींच्या विरोधात हिंसात्मक वातावरण निर्माण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रति त्यांच्या घृणास्पद वागणुकीचं हे उदाहरण आहे.’ कर्नाटकमध्ये जेडीएस काँग्रेससोबत आघाडी करून निवडणुका लढत आहे.