आघाडीतर्फे अमरावतीतून पुन्हा नवनीत राणा निवडणूक लढवणार ?

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरवात केली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस ११ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची यादी जाहीर करणार असल्याचे वृत्त आले आहे. या यादीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेली अमरावती लोकसभेची जागा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोडण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे अमरावतीतील लोकसभा मतदारसंघातील जागेवर नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. अमरावती लोकसभा निवडणूक युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचे रवी राणा यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांना युवास्वाभिमान पक्षाचा पाठिंबा होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या युवास्वाभिमान पक्षाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती शरद पवार आणि अजित पवार यांना केली होती. आमची विनंती शरद पवारांनी मान्य केली असून येत्या ३ -४ दिवसात आघाडीची उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर होईल. असे नवनीत राणा यांनी म्हंटले आहे.

काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे २०१४ ची लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांनीच लढवली होती. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यात हा सामना रंगला होता. त्यावेळी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी विजय मिळवला होता.