‘उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या मुलाचं काय करतात हे सिद्ध झालं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर लगेचच शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना डावलून राजेंद्र गावितांना पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. चिंतामण वनगा यांच्या मुलाचे तिकीट कापल्यामुळे शिवसेनेत दुसऱ्याच्या मुलाचे काय होते, ते अवघ्या महाराष्ट्राला समजले अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. नवाब मलिक म्हणाले की, “कोल्हापुरातील भाषणात म्हणाले होते की, दुसऱ्यांच्या मुलाचे पालन-पोषण करणे ही आमची जबाबदारीच आहे… पण आता चिंतामण वनगा यांच्या मुलाचे तिकीट कापल्यामुळे शिवसेनेत दुसऱ्याच्या मुलाचे काय होते, ते अवघ्या महाराष्ट्राला समजले.” असा खोचक टोला नवाब मलिक यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नवाब मिलक यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात बोलताना नवाब मलिक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आपली तोफ डागली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशावेळी काही पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला होता. सुजय विखेंसाठी अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडून का सोडण्यात आली नाही ? यावर पवार म्हणाले होते की, ‘आपल्या मुलाचा हट्ट ज्याचा त्यानं पुरवावा. दुसऱ्यांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू ?”

‘मी माझ्या पोरांसोबत इतरांच्या पोरांचेही लाड करतो’
शरद पवार यांचा हाच मु्द्दा धरून उद्धव ठाकरे यांनी पवारांना टोला लगावला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “शिवसेना सर्वसामान्य माणसांची आहे. मी माझ्या पोरांसोबत इतरांच्या पोरांचेही लाड करतो. इतरांची पोरं केवळ धुणीभांडी करण्यासाठी असतात, असा माझ्या पक्षाचा विचार कधीच नव्हता आणि असू शकत नाही.” शिवसेनेची हीच टीका राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे आता वनगा प्रकरणामुळे राष्ट्रवादीने आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

काय आहे वनगा प्रकरण ?
खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यावेळी वनगा यांच्या मुलाला शिवसेनेत घेत पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. श्रीनिवास वनगा यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेत पाठवणार असा चंग शिवसेना नेत्यांनी बांधला होता. पालघरची पोटनिवडणूक शिवसेना-भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. याठिकाणी भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावितांना संधी दिली होती. राजेंद्र गावित यांनी पोटनिवडणुकीत बाजी मारत विजय मिळवला होता. मात्र शिवसेना-भाजपा युती जाहीर झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. त्यामुळे गावितांनी शिवबंधन हातात घेत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे.

Loading...
You might also like