‘या निवडणुकीत माझ्यासमोर कोणीही टिकणार नाही , २०२४ ला पाहू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जनतेने ३० वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेलं सरकार निवडलं आहे. जनतेला आता अस्थिरतेकडे जायचे नाही. २०१९ च्या निवडणूकीत माझ्यासमोर कोणीही टिकणार नाही असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या निवडणूकीत एनडीए ३००हून जास्त जागा जिंकून पुन्हा केंद्रात सत्ता स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

२०२४मध्ये माझ्याविरोधात कोणी मैदानात असल्यास तेव्हाच तेव्हा पाहू. काँग्रेसनं निवडणूकीत तरुणांना आश्वासनं देऊन फसवलं आहे. नेहरूसुद्धा गरिबांबद्दल बोलायचे, इंदिराही गरिबीचा मुद्दा उचलायच्या, राजीव हेसुद्धा गरिबीबद्दल बोलायचे, आता त्यांची पाचवी पिढीसुद्धा गरिबीचा मुद्दा उचलत आहे. असे म्हणत मोदींनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

‘आमचं सरकार सत्तेवर येईल तेव्हा आम्ही विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन जाऊ’

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग आणणारे, प्रसारमाध्यमांवर बंदी घालून त्यांची गळचेपी करणारे आणि आणीबाणी लावणाऱ्यांनी मला ज्ञान देण्याच्या भानगडीत पडू नये. महागठबंधनचं गणित थोड्याच दिवसांत कोलमडणार आहे. अर्ज भरल्यानंतर विरोधी पक्ष एकमेकांपासून आणखी विखुरले जातील. २०१९मध्ये जेव्हा आमचं सरकार सत्तेवर येईल तेव्हा आम्ही विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन जाऊ” असंही मोदी म्हणाले आहेत.

‘पाकच्या पंतप्रधानाचे कौतुक करतात त्यांना ओळखले पाहिजे’

मुलाखतीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जे आपल्या देशाच्या पंतप्रधानावर संशय घेतात आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे कौतुक करतात, त्यांना ओळखले पाहिजे. जेव्हा अभिनंदन प्रकरण घडले तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्षांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणाऱ्या जवानाचा आम्हाला अभिमान आहे, असे एकजुटीने सांगण्याची गरज होती. मात्र, ते सोडून या मंडळीने अभिनंदन परत कधी येईल, असा रट्टा लावला होता. त्या रात्री मेणबत्ती मोर्चाची आणि पुलवामा हल्ल्याला राजकीय मुद्दा बवण्याची योजनाही त्यांनी आखली होती. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांचा डाव फसला.” असेही ते म्हणाले.