महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता : राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळतेय असे वक्तव्य काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. तसेच काँग्रेसने कार्यशैलीत सुधारणा केली नाही तर लोकसभेपेक्षा विधानसभेत अधिक फटका बसू शकतो असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत विखे पाटील यांनी हे विधान केले आहे.

काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘कार्यकर्ते काँगेसवर नाराज आहे. पक्षनेतृत्वाने ही स्थिती जाणून घ्यायला हवी. विधिमंडळ काँग्रेस नेता म्हणून मी काम करतो तेव्हा वाटतं पक्षनेतृत्वाने आपल्या मागे ठाम उभं राहायला हवं अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळतेय हे चित्र आहे. राज्यातील नेते कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करु शकले नाहीत. नेतृत्व करण्याची क्षमता ज्यांच्यात नव्हती त्यांना नेतृत्व दिलं तर पक्ष उभा कसा राहणार ? काँग्रेस पक्षाचा इतका दारुण पराभव महाराष्ट्रात कधीच झाला नाही. ज्या सुधारणा करणं गरजेचे आहे त्या केल्या गेल्या नाही. काँग्रेसने कार्यशैलीत सुधारणा केली नाही तर लोकसभेपेक्षा विधानसभेत अधिक फटका बसू शकतो असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.’

राजीनाम्याविषयी बोलताना विखे पाटील म्हणाले की, ‘माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. मी भाजपात जाणार आहे ही चर्चा आमच्याच पक्षांतील काही नेत्यांनी सुरु केली आहे. नाराज वैगेरे काही नाही. पक्षाने जी जबाबदारी दिलीय ती पार पाडेल. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे.’

दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे टीकेची झोड उठली. मात्र काँग्रेसने याकडे दुर्लक्ष करत राधाकृष्ण विखे पाटील यांचाही काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे.