पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या त्याचा हिशोब द्या : राज ठाकरे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभांचा हिशोब मागण्यापेक्षा पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या याचा अगोदर हिशोब द्या. देशभरात भाषण करताना जी स्वप्न दाखवली गेली त्याबद्दल पंतप्रधान एकही शब्द काढत नाहीत, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली. राज ठाकरे आज सोलापूरमध्ये बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपकडून मनसेच्या सभांचा हिशोब मागण्यात आला त्याचा जोरदार समाचार घेतला.

राज ठाकरे पुढे म्हणाले, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया या सारख्या जाहिरातीवर मोदी सरकारने ४ हजार ८८० कोटी रूपये खर्च केले. मेक इन इंडियाचे काय झाले ? स्मार्ट सिटीचे काय झाले ? असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी विचारला. नाशिक महापालिका आणि उद्योगपती यांच्या पैशातून नाशिकमध्ये मनसेच्या काळात जी कामे केली ती स्मार्ट सिटीत दाखवली जात आहेत. नरेंद्र मोदींना तीस वर्षानंतर बहुमत मिळाले, तुम्ही सांगितलेल्या स्वप्नावर लोकांनी मत दिली. कालांतराने लक्षात येते की नरेंद्र मोदी देशाशी खोट बोलले, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

नरेंद्र मोदींवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांना झटका आला आणि त्यांनी एका रात्रीत नोटबंदीचा निर्णय घेतला. देशातील साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मोदी यांनी पाच वर्षापूर्वी जी स्वप्न दाखवलेली होती त्याविषयी ते एकही शब्द बोलायला तयार नाहीत. तर पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या जीवावर मत मागत आहेत.

आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, लोकांना जातीपातीत, धार्मिक गोष्टीत गुंतवून ठेवायचे. आर्थिक दुर्बलांना १० टक्के आरक्षण, दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिल्याचे काय झाले ? आरक्षणाचा फायदा फक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये पण सरकारी नोकऱ्या तरी आहेत कुठे ? असा सवाल त्यांनी केला.

You might also like