लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर आयोगाची नजर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक दक्षतेने कार्यरत राहणार असल्याचे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी आयुक्त कार्यालयात झाली.

यावेळी प्राजक्ता लवंगारे यांनी लोकसभा निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडाव्यात यासाठी राज्याच्या सर्व सीमालगत 40 तपासणी नाके सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यकतेनुसार यात अधिक वाढ करण्याचे तसेच आंतरराज्यीय मद्य तस्करी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

मतदारांना प्रभावित करण्यासाठी मद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषण व दैनंदिन मद्य विक्रीची माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मद्य निर्मिती व घाऊक विक्रीच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून त्याची नियमित पडताळणी करावी. मतदान व मतमोजणीच्या दिवशी असलेल्या मनाई आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. मद्यविक्रीच्या दुकानांमधून असाधारण विक्री झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याबद्दल सखोल चौकशी करून अनुचित प्रकार आढळल्यास त्यावर कडक कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

जिल्हानिहाय असलेली महसूल उद्दिष्टपूर्ती, १४ ऑनलाइन सेवांची प्रभावी अंमलबजावणी, मद्य निर्मितीबाबत संगणक प्रणालीवर करावयाच्या दैनंदिन नोंदी, याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी गुन्हा अन्वेषणाबाबत गुणवत्तापूर्वक काम करण्याचे निर्देश दिले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्याचा वापर केला जातो. निवडणुकीत वस्तू, पैशांबरोबर मद्याचे प्रलोभने मतदारांना उमेदवारांचे प्रतिनिधी दाखवत असतात. उमेदवारांसाठी दिवसभर प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नेते मद्यवाटप करतात. मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी मद्याचा गैरवापर केला जातो. त्यामुळे याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग बारकाईने लक्ष देणार आहे.