अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसावर ; काँग्रेस आघाडीकडे उमेदवार नाहीत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निश्चिती अद्याप झाली नाही. दोन्ही काँग्रेसमधील चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप समाप्त होताना दिसत नाही परिणामी उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत चालला आहे. काँग्रेस आघाडीच्या या धोरण इच्छुकांची उत्कंठा पणाला लागली आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज सोमवारी दिनांक १८ मार्च पासून दाखल केले जाणार आहेत. मात्र पहिल्या टप्प्याचे देखील जागावाटप आघाडीने नीट पूर्ण केले नाही. चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये येऊन निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र त्याठिकाणी त्यांच्या नावाला स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मात्र विरोध केला आहे. तर अकोला, शिर्डी, पालघर या तीन मतदारसंघात तर काँग्रेसकडे उमेदवाराचं नाही अशी अवस्था आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचा पेच कायम आहे तर या दोन मतदारसंघाची अदलाबदल करण्याचा पवित्रा दोन्ही काँग्रेसने घेतला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागी कोणी लढायचे हा देखील पेचच आहे. राष्ट्रवादी हि जागा लढू इच्छित आहे मात्र हि जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या जागेच्या बदल्यात रावेरची जागा काँग्रेसला राष्ट्रवादी देऊ करण्याची शक्यता आहे. तसेच सांगली आणि हातकणंगले या दोन जागा राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेला सोडल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र तोही निर्णय सध्या शेवटाकडे गेला नसल्याचे चित्र आहे. तसेच माढा आणि अहमदनगरच्या जागेचा देखील तिढा कायम आहे.अशा सर्व परिस्थितीमुळे आघाडीतील इच्छुक सध्या बेचेन आहेत.