म्हणून प्रियंका गांधी वाराणसी मधून निवडणूक लढवत नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरवण्याच निर्णय पक्षाने घेतला. प्रियंका गांधी यांनी याबाबत पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या खांद्यावर पूर्ण उत्तर प्रदेशच्या प्रचाराची जबाबदारी आहे. या ठिकाणी ४१ मतदारसंघात पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. एका ठिकाणी राहून मला हे शक्य होणार नसल्याचे, प्रियंका गांधींनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी प्रचारासाठी २८ मार्च रोजी प्रियंका गांधी रायबरेलीमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी स्थानिक कार्य़कर्त्यांनी प्रियंका गांधी यांच्याकडे निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी वाराणसीमधून लढवू का असा प्रश्न कार्यकर्त्यांना केला होता. जरी ही चर्चा अनौपचारिक असलती तरी त्यानंतर प्रियंका गांधी वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. तसेच राजकीय वर्तुळात देखील चर्चा होती.

दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या वाराणसी उमेदवारीवर काँग्रेस प्रवक्ते आमदार दीपक सिंह यांनी प्रियंका गांधी वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी प्रियंका गांधी वाराणसीमधून निवडणूक लढवण्यास तयार असून एक दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

प्रियंका गांधी या वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याचा दावा त्यांचे पती रबर्ट वाड्रा यांनी ही केला होता. त्यामुळे प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणार असल्याचे निश्चित मानले जात होते. त्यांच्या उमेदवारीमुळे मोदींना मोठे आव्हान असल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रियंका यांच्या वाराणसीमधून निवडणूक लढवण्याच्या चर्चांना २५ एप्रिल रोजी पूर्ण विराम मिळाला. काँग्रेसने अजय राय यांच्या नावाची घोषणा करून प्रियंका गांधी यांच्याविषयी सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला.