मायावती १५ कोटी रुपयांना उमेदवारी विकतात : केंद्रीय मंत्री मेनका गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती या १५ करोड रुपयांना लोकसभा उमेदवारीचे तिकीट विकतात असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी केला आहे. मेनका गांधी सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत. बुधवारी सुलतानपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मायावती यांच्यावर हा गंभीर आरोप केला.

यावेळी बोलताना मेनका गांधी म्हणाल्या की, बसपा नेत्या मायावती उमेदवारांना तिकीट विकतात हे सर्वांना माहिती आहे. बसपा पक्षातील नेतेच सांगतात की, आमच्या नेत्या हिरे नाही तर पैसे घेतात. लोकसभा उमेदवारीसाठी १५ करोड रुपयाला एक तिकीट विकले जाते. असे मेनका गांधी म्हणाल्या.

सपा-बसपा आघाडीचे उमेदवार चंद्रभद्र सिंह उर्फ सोनू हे मेनका गांधी यांच्या विरोधात सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवत आहेत. यांच्याकडे उमेदवारीच्या तिकीटासाठी पैसे आले कुठून ? असा सवाल गांधी यांनी उपस्थितांना केला. मेनका गांधी या भाजपाच्या उमेदवार आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभा मतदारसंघाच्या ८० जागा असून २०१४ मध्ये भाजपाला ७० हून अधिक जागांवर विजय मिळाला होता.  २०१९ च्या निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या कट्टर विरोधकांनी एकत्र येत भारतीय जनता पार्टीला आव्हान दिले आहे.