उन्हामुळे प्रचारासाठी नेत्याची भन्नाट कल्पना, चक्क स्वत:चा पुतळाच फिरवला

कोलकाता : वृत्तसंस्था – देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे सुरू आहे. त्यातच प्रचंड उन्हामुळे नेते मंडळी त्रास सहन करत का होईना मतदरांपर्यंत पोहचत आहेत. उन्हावर मात करत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने चक्क आपला पुतळा तयार करून घेतला आहे. हा पुतळा त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते फिरवत आहेत. त्यांच्या भन्नाट प्रचाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. अभिषेक बॅनर्जी असे या नेत्याचे नाव असून उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ही शक्कल त्यांनी लढवली आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार वाढत्या उन्हासारखा तापत चालला आहे. देशात तीन टप्प्यातील मतदान पार पडले असून चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि.२९) होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाच्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पश्चिम बंगाल येथील डायमंड हार्बर मतदार संघातून अभिषेक बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत.

वाढत्या उन्हाचा त्रास त्यांना होत असल्याने त्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. अभिषेक यांनी उन्हापासून आपला बचाव करून घेण्यासाठी स्वत:चा पुतळा तयार करून घेतला आहे. त्यांचे कार्यकर्ते हा पुतळा कारमध्ये ठेवून त्यांच्या मतदार संघातून फिरत आहेत. नेत्याचा जरी प्रचार होत असला तरी कार्यकर्ते मात्र उन्हात काम करताना दिसत आहेत.

पश्चिम बंगालमधील सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तर, बॅनर्जी यांनी प्रचारासाठी सर्वत्र जाण्यास वेळ नसल्यामुळे हा पुतळा बनविल्याचं म्हटलं आहे. पण, उन्हामुळे त्रास होत असल्याने कार्यकर्त्यांच्या सहभागानेच प्रचार करण्याची ही अनोखी शक्कल असल्याची चर्चा सोशल मीडियात होत आहे. दरम्यान, या मतदारसंघात 19 मे रोजी अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे.

https://twitter.com/rishibagree/status/1121810373936443393