लोकसभा निवडणूक : दानवे शुक्रवारी नगरला

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – दुसऱ्या क्रमांकावर असूनही महापौर व उपमहापौर पद मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने नगर दक्षिण व शिर्डी मतदारसंघातून लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे शुक्रवारी (दि. 4) नगरमध्ये येणार आहेत.

दानवे हे दीक्षीत मंगल कार्यालयात त्यांच्या उपस्थित जिल्ह्यातील पदाधिकाच्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलाविण्यात आल्याचे सरचिटणीस किशोर बोरा यांनी सांगितले. संपूर्ण देशात राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेशी युतीचा निर्णय रखडलेला असल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी खासदार दानवे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. खा. दानवे नगर दौऱ्यात दोन्ही मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराच्या नावावर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते.

त्या युतीबाबत काय बोलणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे अहमदनगर महापालिकेत झालेल्या भाजप-राष्ट्रवादी-बसपा युतीबाबत काय भूमिका जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार गांधींचे काय होणार

भाजपाने महाराष्ट्रातील खासदारांच्या लेखाजोखा मागवला आहे. त्यात काही विद्यमान खासदारांचे तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा आहे. नगर मतदारसंघातून खासदार गांधी वगळता आणखी कोण कोण इच्छुक आहेत, याचाही अंदाज त्यांच्याकडून घेतला जाणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.