लोकसभेने ‘महामारी’ विधेयकाला दिली मंजूरी, ‘कोरोना’ योद्ध्यांना मिळणार संरक्षण

नवी दिल्ली : संसदेने सोमवारी महामारी (दुरूस्ती) विधेयकाला मंजूरी दिली, ज्यामध्ये महामारीशी लढणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना संरक्षण प्रदान करण्याची तरतूद आहे. लोकसभेत या विधेयकाच्या चर्चेदरम्यान उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, मागील 3-4 वर्षांपासून आमचे सरकार लागोपाठ महामारीसारखे विषय मार्गी लावण्याबाबत सर्वसमावेशक उपक्रम अवलंबत आहे.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, यासंदर्भात सरकार राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायदा बनवण्यासाठी काम करत आहे. याबाबत न्याय विभागाने राज्यांचे विचार जाणून घेण्याचा सल्ला दिला आहे. पहिल्या दोन वर्षात आम्हाला केवळ चार राज्य मध्यप्रदेश, त्रिपुरा, गोवा आणि हिमाचल प्रदेशकडून सूचना मिळाल्या. आता आमच्याकडे 14 राज्यांच्या सूचना आल्या आहेत.

आरोग्य मंत्री म्हणाले, प्रस्तावित राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायदा बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी त्यांनी व्हायरसवरील संशोधनासंबंधी विविध कामांची माहिती दिली. ते म्हणाले, मागील नऊ महिन्यात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कोविड19 च्या विरूद्ध अभियान राबवण्यात आले. पंतप्रधानांनी स्वता अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

मंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर सभागृहात काही सदस्यांनी विधेयकातील दुरूस्त्यांना विरोध दर्शवला, हा विरोध धुडकावून विधेयकाला मंजूरी देण्यात आली. दरम्यान, वरीष्ठ सभागृहाने काही दिवसापूर्वीच महामारी (दुरूस्ती) विधेयकाला मंजूरी दिली होती.

हे विधेयक संबंधित अध्यादेशाच्या ठिकाणी आणले गेले आहे. हा अध्यादेश एप्रिल, मेमध्ये जारी करण्यात आला होता.

या विधेयकाच्या माध्यमातून महामारी रोग अधिनियम 1897 मध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. यामध्ये महामारीला तोंड देणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना संरक्षण प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. सोबतच, आजार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकारात वाढ करण्याची तरतूद आहे.

या अंतर्गत आरोग्य कर्मचार्‍यांच्या जीवनाचे नुकसान, दुखापत, धोका उत्पन्न करणे, कर्तव्यात अडथळा आणणे आणि आरोग्य सेवेची संपत्ती आणि कागदपत्रांचे नुकसान केल्यास दंडाची तरतुद आहे. याअंतर्गत कमाल पाच लाख रूपये दंड आणि कमाल 7 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.

या विधेयकावरील चर्चेत भाग घेत काँग्रेसचे खासदार कोडिकुन्निल सुरेश यांनी म्हटले की, हे सरकार डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि आशा कर्मचार्‍यांकडे लक्ष देत नाही आणि त्यांना कोरोना योद्ध म्हणत आहे.