भाजपमध्ये इनकमिंग सुरूच : ‘या’ पक्षाचा संस्थापक सदस्य करणार प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी राजकीय पक्षात नेत्यांचे पक्षांतर करून घेण्याची चढाओढ लागली आहे. आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे असलेले कवी कुमार विश्वास आता भाजपाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘आप’मधील बंडखोर नेते कुमार विश्वास हे लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपचा प्रचार करत आहेत. तसेच त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याशी २०१८ मध्ये मतभेद झाल्यानंतर विश्वास यांनी ‘आप’ पासून फारकत घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुर, ‘आप’मधून बंडखोरी करून बाहेर पडलेले कुमार विश्वास भाजपच्या तिकीटावरून पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कुमार विश्वास यांनी पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्लीतील भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. मनोज तिवारी आणि कुमार विश्वास यांच्यामध्ये सोमवारी सुमारे एक तास चर्चा झाली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत असतील, अशी चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्या या भेटीनंतर कुमार विश्वास यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्व दिल्लीमध्ये आपच्या उमेदवार आतिशीविरोधात कुमार विश्वास भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राज्यसभा निवडणुकीची आपकडून कुमार विश्वास यांना उमेदवारी दिली नव्हती. पक्षाच्या विविध कार्यक्रमांतही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर आता राजस्थानच्या प्रभारीपदावरून दूर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यातील मतभेद आणखी वाढले.  गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून कुमार विश्वास टीका करताना दिसत आहेत.