पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देवदर्शनामुळे मतदान ‘साईड ट्रॅक’ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री केदारनाथचे दर्शन घेऊन रात्रभर तेथील गुहेत ध्यानधारणा केली. रविवारी सकाळी ते बद्रीनाथचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले आहेत. देवदर्शनासाठी ते टीव्ही कॅमेरेही बरोबर घेऊन गेले असल्याने देशातील जवळपास सर्व टीव्ही चॅनेलवर त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण होत असून आज ज्या ५९ मतदार संघात मतदान होत आहे. तेथील मतदान प्रक्रिया व त्याचे प्रक्षेपण साईड ट्रॅकला पडले आहे.

मतदानाच्या दिवशी सर्व टीव्ही चॅनेल हे ज्या मतदार संघात मतदान सुरु आहे. तेथील सेलिब्रिटीच्या मतदानानंतरच्या प्रतिक्रिया प्रामुख्याने प्रक्षेपित केले जात आहे. शनिवारी नरेंद्र मोदी हे केदारनाथला पोहचले. त्यांनी केदारनाथचे दर्शन घेऊन तेथे त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या गुहेत रात्रभर ध्यानधारणा केली. हा त्यांचा वैयक्तिक दौरा असल्याचे सांगितले जात आहे.

रविवारी सकाळी मोदी गुहेतून बाहेर आले. ही गुहा खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आली होती. त्यात हवेची सोय करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा हा दौरा खूप अगोदर ठरला असल्याचे समजून येते. आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मोदी हे चौथ्यांदा केदारनाथला आले होते.

मतदानाच्या दिवशी नरेंद्र मोदी नेहमीच काही तरी वेगळे करुन आपल्याकडेच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अहमदाबाद येथील मतदानाच्या दिवशी त्यांनी रोड शो केला होता. त्यावर आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली होती. निवडणुक आयोगाने त्यांना क्लिनचिट दिली होती. पण, त्यावरुन निवडणुक आयोगाच्या आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.

आज ते निवडणुक लढवित असलेल्या वाराणसी मतदारसंघात मतदान होत आहे. वाराणसीला काशी असेही संबोधले जाते. प्रचंड धार्मिक पगडा असलेल्या या मतदारसंघात मतदान होत असताना मोदी यांनी हा केदारनाथ, बद्रीनाथचा दौरा जाणीवपूर्वक आयोजित केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातून आपण किती धार्मिक आहोत, हे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सरीकडे देशभरातील सर्व टीव्ही चॅनेलवर मोदी यांच्या या दौऱ्याचे लाईव्ह प्रक्षेपण होत असल्याने इतर बातम्या मागे पडल्या आहेत. ज्या ५९ मतदार संघात मतदान सुरु आहे. तेथील रिर्पोटिंगही मागे पडले असून सर्वत्र मोदींच्या दौऱ्याचे प्रक्षेपण सुरु आहे.

तशात लोकांना या दौऱ्याची माहिती मिळाल्याने आता बद्रीनाथ मंदिराच्या वाटेवर भाजपाच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. अशी गर्दी होणार हे लक्षात घेऊन अगोदरच तेथे बॅरिकेटींग करण्यात आले होते. हे समर्थक मोदी मोदीचा गजर करत आहेत. त्याचे लाईव्ह प्रक्षेपण सध्या सर्व टीव्ही सुरु आहे. अप्रत्यक्षपणे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे.