जाणून घ्या – एका मतासाठी किती रुपये खर्च होतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात १७ व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यामध्ये मतदान होईल. लोकशाहीत मतदानाचा अधिकार सर्वांना मोफत मिळत असला तरी प्रत्यक्षात त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. संपूर्ण देशभरात निवडणुक प्रक्रिया राबण्यासाठी येणाऱ्या खर्चावर नजर टाकल्यास तुमच्या एका मताची किंमत किती आहे हे लक्षात येईल.

देश पातळीवर निवडणूक घेण्यापूर्वी निवडणूक आयोग काही महिने आधीपासून तयारीला सुरुवात करते. देशाच्या कायदा व न्याय मंत्रालयाने ऑक्टोबर १९७९ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लोकसभा निवडणुकीची संपूर्ण खर्च भारत सरकारद्वारे उचलण्यात येतो. राज्यात निवडणूक असतील तर त्या राज्याचे सरकार त्या राज्यातील निवडणुकीचा खर्च करते. तसेच केंद्र आणि राज्यातील निवडणूक एकत्रित आल्यास राज्यातील निवडणुकीचा खर्च भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात समान प्रमाणात वाटला जातो.

लोकसभा निवडणुकीसाठी खर्च –

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १९५२ साली पहिल्या लोकसभेसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी फक्त १० कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यानंतर १९५७ आणि १९६२ साली पार पडलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसभेसाठी देखील सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च आला होता.१९८४-८५ साली असलेल्या आठव्या लोकसभेपर्यंत हा खर्च १०० कोटी रुपयांपर्यंत पोचला. तर १९९६ साली झालेल्या ११ व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या खर्चाने ५०० कोटींचा आकडा पार केला. २००४ साली झालेल्या चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च तब्बल १००० कोटींवर पोचला होता. गेल्या लोकसभेच्या (२०१४) निवडणुकीत निवडणूक आयोगाला ३८७० कोटी रुपयांचा खर्च आला. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यात तिपटीने वाढ झाली.

प्रत्येक मतदारामागे खर्च –

सहाव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक मतदारामागे एक रुपया खर्च येत होता. १९९६ मध्ये म्हणजेच ११ व्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा खर्च १० रुपयांच्या वर पोचला. तर १९९९, २००४,२००९ लोकसभा निवडणुकीच्या वेळी तो सरासरी १५ रुपये झाला. १६ व्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रति मतदार सरासरी सुमारे ५० रुपये मतदार खर्च आला आहे.