करकरे शहीदच, मात्र पोलीस अधिकारी म्हणून त्यांची भूमिका अयोग्य : सुमित्रा महाजन

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाईन – भोपाळ मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली. मात्र आता लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करीत एकच खळबळ उडवून दिली आहे. ‘हेमंत करकरे यांचा कर्त्यव्यावर असताना मृत्यू झाला म्हणून त्यांना शहीद मानले जाईल मात्र एटीएसप्रमुख म्हणून त्यांची भूमिका योग्य नव्हती’. असे वक्तव्य सुमित्रा महाजन यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान देखील त्यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी आपले मत मांडले होते.

सुमित्रा महाजन यांनी केवळ करकरे यांच्या भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित केला नाही तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यावर देखील हल्लाबोल केला. ‘शहीद हेमंत करकरे हे काँग्रेसचे संरक्षण होते. तसेच ते दिग्वीजय सिंग यांच्या जवळचेही होते असे देखील बोलले जात असल्याचे’ सुमित्रा महाजन यांनी सांगितले.

माझ्यासाठी देश आधी , तुच्छ राजकारण नाही

सुमित्रा महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मात्र दिग्वीजय सिंग यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, ” अशोकचक्र विजेता हेमंत करकरे यांच्याशी माझा संबंध जोडला गेला त्याचा मला अभिमान आहे. महाजन यांच्या सहकाऱ्यांनी शहीद करकरेंचा कितीही अपमान केला तरी मी सदैव देशहित , राष्ट्रीय एकता आणि अखंडतेबाबत बोलणाऱ्यांच्या सोबत असल्याचा मला अभिमान आहे. असे दिग्विजय सिंग म्हणाले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना बजरंगदल या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची शिफारस करण्याचे धाडस मी दाखवले होते. माझ्यासाठी देश सर्वात आधी आहे, तुच्छ राजकारण नाही अशा शब्दात सिंग यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला.

नक्की काय म्हणाल्या प्रज्ञासिंह

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल संतापजनक वक्तव्ये केली होती.

“मी त्याला सांगितलं होतं तुझा सर्वनाश होईल. ठीक सव्वा महिन्यात सुतक लागतं. ज्या दिवशी मी गेले होते. त्याचं सुतक लागलं होतं. आणि ठिक सव्वा महिन्याने ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली त्या दिवशी त्याचा अंत झाला”. असे प्रज्ञा सिंह म्हणाल्या.