लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा

इंदुर : वृत्तसंस्था – लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन लोकसभा निवडणूक लढवणार की नाही या बाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे. कारण सुमित्रा महाजन यांनी स्वतः याबाबत खुलासा करतांना, ‘मी आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही. इंदुरच्या उमेदवाराबाबत आता पक्ष योग्य तो निर्णय घेऊ शकतो, अशा आशयाचे पत्रच महाजन यांनी जारी केले आहे.

भाजपने ७५ वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी न देण्याबाबत धोरण निश्चित केले आहे. या धोरणाच्या आधारे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारीपासून वंचित रहावे लागले आहे. त्यात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या जागेबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर त्यांनीच खुलासा केल्याने आता तेथील जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

सुमित्रा महाजन या इंदूर येथून सलग ८ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. सध्या त्यांचे वय ८० वर्षे असल्याने पक्षाच्या धोरणात त्यांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. परंतु, यांची इंदूरमध्ये लोकप्रियता लक्षात घेता त्यांना उमेदवारी नाकारणे पक्षश्रेष्ठींना शक्य होत नव्हते.  अखेरीस सुमित्रा महाजन यांनीच निवडणूक न लढवण्याची घोणषा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे.