लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाची दुसरी मोठी लाट सुरु झाली असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 43 हजार 846 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी जवळपास 27 हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशात गेल्या 24 तासात 197 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यू यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट 19 मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना 30 मार्चपर्यंत एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सने बुलेटीन काढून बिर्ला यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने म्हटले आहे.

दिल्ली आणि महाराष्ट्रासह देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या 8 राज्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे.