लोकमान्य टिळकांमुळे स्वातंत्र्य चळवळीला भारतीयत्त्व प्राप्त झाले : HM अमित शाह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   लोकमान्य टिळकांच्या प्रवेशानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याची व्याप्ती वाढली. देशाची अखंडता, संस्कृती, परंपरा, भाषा यावर खरा राष्ट्रवाद अवलंबून असतो, या टिळकांच्या विचारांनी स्वातंत्र्य चळवळीला खर्या अर्थाने भारतीयत्व प्राप्त झाले. त्यामुळे ही चळवळ जनतेशी जोडली गेली. टिळकांनी शंभर वर्षापूर्वी मांडलेले विचार आजही कालातित असून, त्याच विचारांनी देशाची वाटचाल सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीतील विविध प्रश्नांची उत्तरे टिळकांच्या विचारात आहेत. नव्या पीढीने या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिचरित्राचा अभ्यास करून भविष्यात वाटचाल करावी, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.

लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दी वर्षदिनानिमित्त भारतीय सांस्कृतिक परिषद आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या ‘लोकमान्य टिळक – स्वराज्य ते आत्मनिर्भर भारत’ या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उद्धघाटन करताना शाह बोलत होते. यावेळी दिल्लीतून खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आणि पुण्यातून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, टिळक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, आमदार मुक्ता टिळक, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते.

शहा म्हणाले, ‘केवळ राष्ट्रभक्ती ब्रिटिशांच्या गुलामगिरीतुन मुक्त करणार नाही, तुमचे कर्म तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल. त्या कर्मयोगाचे महत्व पुढील पीढीला समजावे, म्हणून गीतारहस्य आहे. पारतंत्र्यात असताना कॅांग्रेसच्या आंदोलनांना वास्तविक बळ केवळ लोकमान्य टिळकांमुळे मिळाले. त्यामुळेच महात्मा गांधींपासून ते आगरकर, मदन मोहन मालवीय हे सर्व लोकमांन्यांच्या विचारा्ंनी प्रेरीत होते. स्पृष्य अस्पृष्यता झुगारून माणसातच देव आहे, बालविवाहात मुलीचे वय जास्त असावे, भविष्यात देशाची दशा आणि दिशा ठरवून ‘आत्मनिर्भर भारत’ कसा होईल अशा विचाराने कर्म योग सांगणाऱ्या लोकमान्यांचा हा इतिहास मात्र बाजूला ठेवला जातो याची खंत वाटते.’

उत्तम वक्ता, राजकारणी, व्यासंगी, पत्रकार, असे अनेक गुणसंपन्न व्यक्तीमत्व असलेले लोकमान्य टिळक यांनी जमिनीशी नाळ तुटू दिली नसून त्यांचे हेच गूण तरुणांनी आत्मसात करण्यासारखे आहे. हे सांगताना शहा म्हणाले, ‘मरण’ आणि ‘स्मरण’ यामध्ये एका आद्याक्षऱाचा फरक आहे. परंतु, तब्बल एक शतकापूर्वी मरण आलेल्या व्यक्तीचे स्मरण अजूनही होत असून अशा दूरदृष्टी आणि बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या लोकमांन्यांचे चरित्र नवीन पिढीने वाचावे, आत्मसात करावे, भविष्यात येणाऱ्या अडचणी नक्कीच दूर होतील, भारत आत्मनिर्भर बनेल आणि हीच खरी लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली ठरेल, असे शहा यांनी सांगितले.

स्वतः बनविलेल्या वस्तूबाबत वेगळाच अनुभव असतो म्हणून स्वदेशीचा नारा देणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या अभिप्रेरणेनुसार देशा सध्या आत्मनिर्भरतेनुसार वाटचाल करत असल्याचे डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. तसेच देशातील समाज एकसंधतेसाठी स्वभाषा आणि स्वभूषा आत्मसात करावी. त्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील स्वः ओळखावा, त्यानंतर आत्म परिचय करून वाटचाल करावी, असे डॅा. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

डॅा. टिळक म्हणाले, आत्मनिर्भर भारत, मॉडर्न इंडिया, स्वदेशी, स्वराज्य या संकल्पना लोकमान्यांनी त्या काळात मांडल्या. परंतु, त्यांच्या पश्चात शंभर वर्षानंतर भारत त्यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी प्रथम तरुणांनी स्वतः स्वतःला ओळखले पाहिजे. शिक्षण हेच देशाचे भविष्य घडवू शकते म्हणून उत्तम शिक्षण ग्रहण करून त्याचा उपयोग देशातच करावा आणि उज्ज्वल भारत करावा. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी या्ंनी देखील आत्मनिर्भर भारतासाठी भारताला संदेश देऊन वाटचाल सुरु केली असल्याचे डॅा. टिळक यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीर्इएस) अध्यक्ष डॉ. शरद कुंटे या्ंनी महाविद्यालयीन तरुण लोकमान्यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन त्यांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले. राष्ट्र निर्मितीसाठी डीर्इएसचे योगदान मोलाचे आहे. सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण, किफायतशीर शिक्षण देण्यासाठी संस्था कार्यरत असल्याचे मत व्यक्त केले.

तर भारतीय परराष्ट्र सेवेतील विनेश पटनायक यांनी शिक्षण, संस्कृती आणि माध्यमे हीच देशाची प्रमुख शस्त्रे असल्याचे लोकमांन्या्ंनी सांगितले असून तरुणांनी या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे सांगत आभार मानले.

चौकट

आजही स्वातंत्र्यता भारताच्या आंदोलनाचा विचार मनात येतो किंवा आठवतो तेव्हा प्रथम पुणेरी पगडी, शुभ्र धोती, कुडता आणि सफेद पटका, हातात छडी आणि झुबकेदार मिशा असणारे प्रतिभाशाली व्यक्तीमत्व मृत्यूच्या शतकानंतरही समोर येते; ही सर्वात कठीण बाब आहे. विशेष म्हणजे त्यांची ‘स्वराज्य हा माझा ज्न्मसिद्ध हक्क आहे…’ या सिंहगर्जनेचे शब्द समोर येतात. जोपर्य़ंत देशाची स्वातंत्र्यता, अखंडता अबाधित राहील तोपर्यंत ही अक्षरे, शब्द चिरंजीव राहतील असे गौरवोद्गार शहा यांनी काढले.