कोल्हापुरात SM विरुद्ध DM लढत, मात्र सतेज पाटलांची भूमिका महत्वाची ; कसा असेल निकाल ?

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर मतदार संघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदार संघावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पाहायला मिळतो. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने अवघ्या ३३ हजार मतांनी विजय मिळवून वर्चस्व राखले होते.

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापूर मतदार संघात SM विरुद्ध DM अशी चुरस पाहायला मिळणार आहे. पण खरी लढत ही सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यातच आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. साहजिकच यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील हे वैर डोके वर काढत असल्याचे बोलले जात आहे. सतेज पाटील यांचा कोल्हापुरात चांगलाच दबदबा आहे. सतेच पाटील स्वतः जरी लोकसभेच्या रिंगणात नसले तरी मात्र आघाडीत असून देखील शिवसेनेला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

…तरीही सुटले नाही कोडे

धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वादाचा सर्वाधिक फटका आघाडीला बसणार आहे. म्हणूनच या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवार या दोघांची भेट घेणार होते. मात्र यावेळी ऐन वेळेला शरद पवार कोल्हापूरात दाखल होताच सतेज पाटील ‘ऑऊट ऑफ कोल्हापूर’ झाले. याचदरम्यान बंटी पाटील समर्थकांनी सोशल मिडियात पोस्ट व्हायरल करणे सुरू केले आहे. ‘पवारसाहेब, आम्ही तुमचा आदर करतो. आमचा विरोध महाडिक प्रवृत्तीला आहे राष्ट्रवादीला नाही’ असा संदेश बंटी पाटील समर्थकांनी सोशल मिडियावर व्हायरल केले. यातून धनंजय महाडिक यांच्याशी आता जुळवून घेणे शक्य नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सूचवले. कोल्हापूर मतदार संघात त्यांच्या वादाचा यंदाच्या निवडणुकीत मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

महाडिक-पाटील वादाचा फायदा शिवसेनेला ?

शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा बंटी पाटील यांचे कार्यकर्ते उघड प्रचार करत आहेतअसे समजते आहे. तसेच सोशल मिडियातही महाडिकविरोधी पोस्ट व्हायरल करत आहेत. सतेज पाटील यांना मानणारा कोल्हापूर शहर व परिसरात मोठा वर्ग आहे. त्याचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार महाडिक यांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. सतेज पाटील दीड-दोन लाख मते युतीच्या पारड्यात टाकू शकतात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत याचा फटका महाडिकांना आणि राष्ट्रवादीला बसणार असल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like