काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का ; ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक जशी-जशी जवळ येऊ लागली आहे तशी-तशी राजकीय पक्षात नेत्यांचे पक्षांतर करून घेण्याची चढाओढ लागली आहे. निवडणूका सुरु असताना काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. केरळमधील माजी केंद्रीय मंत्री आणि केरळ काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते एस. कृष्णा कुमार यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. एस. कृष्णा कुमार हे कोल्लम मतदार संघातून कॉंग्रेस खासदार राहिलेले आहे. कोल्लम मतदार संघात त्यांचे वर्चस्व आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपचा रस्ता धरला आहे. त्यामध्ये एस. कृष्णा कुमार यांची भर पडली आहे. एस. कृष्णा कुमार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसैन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

पक्षांतराविषयी एस. कृष्णा कुमार म्हणाले की , ‘ पुढील १० वर्ष देशाची सत्ता भाजपकडे असावी असे माझे प्रामाणिक मत आहे. राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आणि नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम केल्यानंतर आता उर्वरित काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय मी घेतला आहे. सोनिया गांधी आणि आता त्यांचा मुलगा राहुल गांधी याच्या नेतृत्वाविरोधात मी उभा असून नरसिंह राव यांच्या अस्थिंना एआयसीसीमध्ये ठेवण्याची यांनी परवानगी दिली नव्हती आणि त्यांचा अपमान केला होता.’ तसेच सोनिया गांधी यांना भारतीय संस्कृती आणि पंरपरांची माहिती नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.