निवडणूकीसाठीच ४० जवान मारले का ? राज ठाकरेंचा सवाल 

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या भाषणात वारंवार पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करतात. मोदींना प्रचार करता यावा म्हणून आमचे ४० जवान मारले का? प्रचारात भाषण करता यावीत म्हणून पुलवामा घडविण्यात आलं का ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साताऱ्यातील सभेत उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात मोहिम उघडली आहे. राज ठाकरेंनी पुराव्यांनिशी आपल्या सभांमधून भाजपवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची आधीची विधानं आणि त्यांचे व्हिडीओ दाखवून हल्लाबोल केला आहे.

साताऱ्यातील सभेत त्यांनी मोदींवर तोफ डागली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं भाषण स्क्रीनवर दाखवला. सीआरपीएफ, लष्कर, पोलीस सर्वकाही सरकारच्या ताब्यात असताना दहशतवादी सीमा ओलांडतात कसे? त्यांना पैसा कुठून येतो? सर्व यंत्रणा तुमच्या हातात आहेत. मग हे सगळं कसं काय होतं? मोदींनी तेव्हा हे प्रश्न उपस्थित केले होते. आता मोदींनी याच प्रश्नांची उत्तरे द्यावीत. असं राज ठाकरे म्हणाले.

एअर स्ट्राईकवरून मोदी राजकारण करतात. पाकिस्तानला धडा शिकविल्याचं म्हणतात. मग पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान भारताचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच व्हावेत असे का म्हणतो?. मोदींच्याच सत्ताकाळात सर्वाधिक जवान शहिद झाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानला लव्ह लेटर लिहीणं बंद करा असं म्हणणारे, त्यांनी एक मारला तर चार मारा म्हणणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर नवाज शरीफ यांना शपथविधी सोहळ्याला बोलवतात. वाट वाकडी करून अचानक नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक भरवायला जातात. त्याच्याकडे बिर्याणी खातात. मोदी हे सर्व करत असताना शहिद जवानांच्या कुटुंबाला काय वाटत असेल असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.