साताऱ्याच्या सभेत शरद पवारांची जीभ घसरली ; म्हणाले ‘अमित शहा, उखड काय उखडायची ते’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे अध्यक्ष अमित शहा बारामतीत येऊन उखडायची भाषा करतात. शहा उखड काय उखडायचे ते, असे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जीभ घसरली. यावेळी शरद पवार यांनी अमित शहा यांची नक्कल देखील करून दाखवली.

शरद पवार यांनी अमित शहा यांची नक्कल करत म्हणाले की, प्रधानमंत्री बारामती में नही आ सके इसलिये मै आया हूँ. कायको आया हूँ? शरद पवार को उखाडने के लिए आया हूँ ! मी म्हटलं, ‘उपटा आमची !’ महाराष्ट्राच्या मातीमध्ये तू आलाय तुला काय आम्ही असेच वाटलो का? महाराष्ट्राच्या मातीत कोण आला आणि दम देवू लागला, उखाडण्याची भाषा करू लागला तर त्याला हेच सांगावं लागेल,  बाप जन्मात तुला महाराष्ट्राच्या भूमीत यश मिळणार नाही, असा इशाराही पवारांनी दिला.

महाराष्ट्राच्या मातीत येऊन उखडण्याची भाषा कोण करत असेल, तर ही माती त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शरद पवार यांनी दिला. शरद पवार राष्ट्रवादीचे साताऱ्यातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभेत बोलत होते.अमित शहांनी बारामतीकरांना विचारले, क्या किया शरद पवारसाब ने पच्चास सालों में ? अरे तू काय केले ते आधी सांग. मोदी यायच्या आधी तुझे नाव तरी देशाला माहित होते का ? कोण अमित शहा ? आम्हाला फक्त माहित होते एकदा तुरुंगात होता. ते कशासाठी होता याच्या खोलात जायचे नाही, असे ही शरद पवारांनी म्हटले.