आयुर्वेद महाविद्यालय गुंडांचा अड्डा डॉ श्रीधर दरेकर यांचा आ. जगताप पिता-पुत्रांवर आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहराचे भकासीकरण करुन, जिल्ह्याचे वाटोळे करण्यास निघालेल्या जगताप पिता-पुत्रांनी आयुर्वेद महाविद्यालय रसातळाला नेले. आयुर्वेद महाविद्यालय म्हणजे गुंडांचा अड्डा बनला असून, येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे, असा आरोप नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे किसान कामगार पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रा.डॉ.श्रीधर दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

गुणे आयुर्वेद महाविद्यालयात 35 वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर आलेले अनुभव दरेकर यांनी पत्रकार परिषदेत विशद केले. ते म्हणाले की, आ.जगतापांच्या चुकीच्या कार्य पध्दतीला विरोध केल्याने त्यांनी मानसिक, शाररिक, कौटुंबिक व आर्थिक त्रास दिला. भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून संस्थेचे पदाधिकारी शताब्दी वर्ष साजरा करीत नाही. शंभर वर्षानंतर देखील गुणे यांची त्यांना आठवण होत नसून, हा निर्लज्जपणाचा कळस आहे.

आ.अरुण जगताप संस्थेचे सभासद नसताना देखील त्यांनी ही संस्था बळकावली. संस्थेचा स्वहितासाठी गैरवापर केला. इंपिरीयल चौकात सुरु केलेले अरुणोदय विद्यालय त्यांना चालवता आले नाही. त्याप्रमाणे आयुर्वेद महाविद्यालयदेखील त्यांच्या हातून बंद पडणार आहे. आयुर्वेद महाविद्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सोयी-सुविधा नसल्याने येथे रुग्णांचा पत्ता नाही. 15 वर्षापासून ऑपरेशन थेटर व एक्स रे मशीन बंद आहे. नावालाच पॅथॉलॉजीकल लॅब असून, महाविद्यालयातील महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांना देखील दर्जेदार शिक्षण दिले जात नाही. दक्षिण लोकसभेचे राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार असलेले आ.संग्राम जगताप देखील त्यांच्या वडिलांच्या गैरकारभाराला खतपाणी घालत आहे.

जगताप पिता पुत्रांवर अनेक गुन्हे दाखल असून, केडगाव दुहेरी हत्याकांडात देखील ते अडकले आहेत. विधानसभेत भाजप व शिवसेनेच्या भांडणात ते निवडून आले. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर हल्ल करुन त्यांनी आपला दहशतीचा नमुना नगरकरांपुढे सादर केला होता. यांच्याकडून जनतेला विकास नव्हे तर दहशतीचीच अपेक्षा उरली आहे. यांच्या विरोधात तक्रारी केल्यास ते तक्रारदाराल पळवून नेऊन त्यांना मारहाण करतात. अशा दहशतवाद्यांना जनता या निवडणुकित खड्यासारखे बाजूला काढणार असल्याची भावना डॉ.दरेकर यांनी व्यक्त केली. तर संस्थेवर प्रशासक नेमावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती दिली.

संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना कर्मचार्‍यांच्या पेन्शन व ग्रॅच्युटीसाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून दिला. निवडून आल्यास दहशतमुक्तीचे वातावरण निर्माण करुन, समन्याय पाणी वाटप, स्वतंत्र्य उत्तर व दक्षिण जिल्हा विभाजनाचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तर पाणी, वीज, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले. विखेला सोडा, जगतापांना सोडा… दरेकरला जोडा हा संदेश घेऊन मतदारां पर्यंन्त जात असल्याचे त्यांनी सांगितले व जनतेच्या प्रश्‍नासाठी अहोरात्र उपलब्ध असणार असल्याचे विशद केले.