‘त्या’ कार्यकर्त्यांचा मते मिळविण्यासाठी ‘बदनामीचा’ फंडा

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – (अब्बास शेख) – सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोशल मिडियावर आपापल्या परीने आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. परंतु काही अतिउताविळ कार्यकर्ते मात्र खालच्या पातळीवर जाऊन विरोधी उमेदवारांची मुद्दाम बदनामी करताना दिसत आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्ते आपापल्या परीने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेत असल्याचे दिसत आहेत. मात्र अति उतावीळ पेड (मटन,दारूवरील) कार्यकर्ते मात्र आपल्या उमेदवाराचे गुणगान करताना अतिशय खालच्या भाषेचा वापर करताना दिसत आहेत. समोरचा उमेदवार हा क्रूर पद्धतीचा शासक होता, त्याने त्याच्या काळात फक्त अन्यायच केला, हे मुद्दाम केले नाही आणि जे केले ते फक्त त्यांच्याच परिसरासाठी केले इथपासून ते तो उमेदवारच निष्क्रिय आहे हे पटवून देण्यासाठी मोठा खटाटोप केला जात आहे.

आमचा उमेदवारच विकास करू शकतो हे पटवून देण्यासाठी कधी इतिहासाचा अभ्यास न केलेले पण नेटवर पंधरा तास वाया घालवणारी नुकतीच वयात आलेली युवा पिढी ८० वर्षांचा अनुभव असल्याचा आव आणत सोशल मीडियावर, पाणी, वीज, रस्ते याबाबत मृगजळाच्या थापा मारून वातावरण तप्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच इर्षेतून आता समोरील उमेदवारास बदनाम करण्यासाठी नवनवीन फंडे वापरात आणले जात आहेत आणि ते सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले जात आहेत. यावरून भांडणे, धमक्या, मारामाऱ्या असले प्रकारही घडत आहेत त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि पोलिसांनी सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या बदनामीच्या पोस्ट, कमेंटवर बारीक लक्ष देऊन अश्या बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे बनले आहे.