लग्न भलत्याचच झालं, पोरं दुसऱ्यांना झाली, मांडीवर खेळवण्याची वेळ फडणवीस आणि माझ्यावर : नितीन गडकरी

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – लातूर लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगार यांच्या प्रचारार्थ सोमवारी जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती.  यावेळी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सडकून टीका केली. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, ” राज्यातील पाण्याची समस्या ही काँग्रेस राष्ट्रवादीचे पाप आहे. त्यांनी सिंचनात मोठा भ्रष्टाचार केला. त्यांचे बंद पडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझ्या खात्यातून ४० हजार कोटी रुपये दिले. ही बाब म्हणजे लग्न भलत्याचच झालं. पोरं त्यांना झाली. या पोरांना मांडीवर बसवून खेळवण्याची जबबादारी मुख्यमंत्री फडणवीस व माझ्यावर आली”. अशा शब्दात गडकरींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

हा निधी म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला दिलेली श्रद्धांजली 

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले , ” राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचनाची अर्धवट अवस्थेत स्मारके उभे केली आहेत. ही स्मारके पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान सिंचन व बळीराजा योजनेतून ४० हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला दिलेली श्रद्धांजली आहे” , अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

मराठवाड्याचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही
मराठवाड्याचा वाळवंट होत आहे. आम्ही आता नद्या जोड प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यात दबडगंगा पिंजर आणि तापी नार नर्मदा हे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. पहिल्या प्रकल्पावर धरण बांधून त्यातील पाणी गोदावरीत सोडले जाणार आहे. यातून ते जायकवाडी प्रकल्पात आणले जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. मराठवाड्याला वाळवंट नव्हे तर कॅलिफोर्निया केल्याशिवाय मी राहणार नाही, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी लातूरकरांना दिला.

यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव उपस्थित होते.

Loading...
You might also like