एक दिवसापुर्वी लोकसभेत निवडून आलेल्या नातवाचा आजोबासाठी ‘राजीनामा’

बंगळूर : वृत्तसंस्था – काल पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत देशातील दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. देशातील सर्वात महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील अमेठी या पारंपरिक मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे अनेक जेष्ठ नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. यात मल्लिकार्जुन खरगे यांना गुलबर्गा येथून आणि माजी पंतप्रधान निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांना पराभवाचा सामना करावा लागला.
loksabha

कर्नाटकात भाजपने काँग्रेस आणि निजदचा पराभव करताना २८ पैकी २५ जागांवर विजय मिळवला. त्यात माजी पंतप्रधान निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना हे हासनमधून विजयी झाले आहेत. मात्र आता त्यांनी आपल्या आजोबांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी ते आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार झाले आहेत. आपण राजीनामा दिल्यास त्या ठिकाणी पुन्हा आजोबा उभे राहतील आणि निवडून देखील येतील असा विश्वास प्रज्वल रेवन्ना याने व्यक्त केला आहे. देवेगौडा हासन येथून ५ वेळा खासदार राहिले आहेत. सलग तीनवेळा ते येथून निवडून आले होते. यावेळी त्यांनी आपली जागा नातू रेवन्नाला दिली.

याबाबत, अधिक बोलताना ते म्हणाले की, राज्यात निजदने गमावलेला जनाधार पुन्हा मिळवून देण्यास कटीबद्ध आहे. या पराभवामुळे जे नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यास मी तयार आहे. त्यामुळे आता तरुण प्रतिनिधी आणि नेतृत्व म्हणून प्रज्वल कर्नाटकमध्ये आपल्या पक्षाला किती पुढे नेतो हे पाहणे महत्वाचे आहे.