विरोधकांना दारुण पराभव दिसु लागल्याने अफवा पसरविण्याचे काम सुरू : रमेश थोरात

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – (अब्बास शेख)- दौंड तालुक्यामधून हजारोंचे लीड घेण्याची बतावणी करणाऱ्या विरोधकांना आता दौंडमधूनच मोठा विरोध होत आहे. त्यामुळे आता आपला लोकसभेत दारुण पराभव होणार आहे हे त्यांना स्पष्ट दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे त्यामुळे ते कुठल्याही थराला जाऊन आता सोशल मीडियावर अफवा पसरवू लागले आहेत परंतु त्यांची डाळ आता अजिबात शिजणार नाही  असा टोला दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी विरोधकांना लगावला आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्याविषयी काहींनी सोशल मीडियावर अफवा पसरविण्याचे प्रकार सुरू केले असून शेतकऱ्यांनी आमच्या उमेदवारांना मतदान करावे अन्यथा तुमचा ऊस आम्ही नेणार नाही अशी खोटी अफवा थोरात यांच्याबाबत  पसरवली जात आहे. तर एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये महामानवांना अभिवादन करताना काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकून ते आम्हाला येऊन मिळाले अश्या आशयाचे मेसेज टाकून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू झाले आहे. हे सर्व प्रकार हास्यास्पद असून विरोधकांना दौंड तालुक्यातून होत असलेला विरोध आणि त्यामधून त्यांना आलेली निराशा यामधून हा प्रकार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोण आहेत रमेश थोरात – रमेश थोरात हे दौंडचे माजी आमदार असून ते गेल्या पस्तीस वर्षांपासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडून आलेले आहेत तसेच ते सध्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष असून 1999 साली ही ते अध्यक्ष झाले होते. रमेश थोरात हे अजित पवारांचे अत्यंत निकटचे आणि विश्वासू  सहकारी मानले जातात तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. दौंड तालुक्यामध्ये रमेश थोरात यांना मानणारा मोठा गट असून त्यांची तालुक्यात मोठी पकड आहे.