नागपूरमध्ये पाटोलेंचे स्वप्नभंग, नितीन गडकरी पुन्हा विजयी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात सर्वाधिक संघात चर्चिल्या गेलेल्या मतदार संघापैकी एक असणाऱ्या नागपूर मतदार संघात नितीन गडकरी यांनी विजय मिळवला आहे. नागपूर मतदार संघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले यांच्या लढतीमुळे ही निवडणूक खूपच गाजली. नाना पटोले हे नागपूरच्या मतदारांसाठी बाहेरचे उमेदवार असले तरी नितीन गडकरींना त्यांनी चांगलीच लढत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघानंतर भाजपसाठी नागपूर देशातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ मानला गेला. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय याच मतदारसंघात आहे. शिवाय मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी भाजपचा चेहरा असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हा मतदारसंघ आहे.

लोकसभा मतदार संघात एकूण मतदार २१ लाख ६० हजार २१७ मतदार आहेत. यंदा ५४.७४ टक्के मतदान झाले असून ११ लाख ८२ हजार ५०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

गडकरी विरुद्ध पटोले सामना
अनेक वर्षं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नागपूर लोकसभा मतदारसंघ २०१४ मध्ये भाजपकडे आला. नितीन गडकरी यांनी गेल्या वेळी नागपूरमधून जोरदार मताधिक्य मिळवले होते. यावेळी नितीन गडकरीं विरोधात काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी गडकरींविरोधात लढण्यास अनुत्सुकता दाखवली होती. पटोले आधी काँग्रेसमध्येच होते, नंतर ते भाजपमध्ये गेले आणि गेल्या वर्षी भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही म्हणत त्यांनी पक्षातून तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता . देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले. पटोले हे स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचे समर्थक मानले जातात. नाना पटोले हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत . २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता.