सांगलीच्या तिरंगी लढतीत संजयकाका पाटील विजयी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली लोकसभा मतदार संघात यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली. सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यात चुरस रंगली. खरी लढत ही खासदार संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातच होती मात्र गोपीचंद पडळकर यांची मतं निर्णायक ठरली. या निवडणुकीत संजयकाका पाटील हे १ लाख ४४ हजार ३३३ एवढया मतांनी विजयी झाले. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना ४,५१,८८३ एवढी तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना ३,०७,५५० एवढी मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना २,६४,६२३ एवढी मते मिळाली. सांगली लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ०३ हजार ०५४ मतदार आहेत. त्यापैकी ११,१७,३४४ मतदारांनी मतदान केले.

सांगली मतदार संघ म्हणजे काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला मनाला जात होता मात्र २०१४ साली भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रेकॉर्ड ब्रेक करीत सांगलीत भाजपचा झेंडा फडकावला. आता पुन्हा सांगलीत भाजपने बाजी मारली आहे. मात्र स्वाभिमानीच्या विशाल पाटील यांनी देखील त्यांना टफ फाईट दिली. २०१४ च्या मोदी लाटेत सांगलीचा गड काँग्रेसच्या हातून निसटला. २०१९ ची लोकसभा निवडणूक पाहता पश्चिम महाराष्ट्रात महत्वाच्या समाजलया जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१४ च्या निवडणुकीनंतर मात्र भाजपशी सोडचिठ्ठी घेतली. यंदाच्या निवडणुकीत स्वतः चा स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरला. या निवडणुकीत पुन्हा एकदा या मतदारसंघावर ताबा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता आणि त्यासाठी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत घेतली. सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, जत, खानापूर, पलूस कडेगाव, तासगाव कवठे महांकाळ या विधानसभा मतदारसंघ येतात.

वंचित बहुजन आघाडीची मतं निर्णायक
सांगलीमध्ये बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार होते . वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर रिंगणात होते . सांगलीमधला खरा मुकाबला काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे. तरीही वंचित आघाडीची निर्णायक मते कुणाला फायदा करून देतात यावरच भाजप आणि काँग्रेसचं इथलं यश अवलंबून होते. त्यानुसार भाजपला ४,५१,८८३ इतकी ,स्वाभिमानीला ३,०७,५५० इतकी तर नव्या वंचित बहुजन आघाडीला २,६४,६२३ इतकी मते मिळाली.