मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करतो : नितीन गडकरी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. पाण्याची समस्या आमचे पाप नाही तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे. नदीजोड प्रकल्प सुरूवात करण्यात आलेला आहे. यामुळे मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न यातून सोडवणारच असा निर्धार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करतो आणि जे करू शकतो तेच बोलतो असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासभेत बोलत होते. या पुर्वीच्या सरकारने मराठवाड्यातील पाण्याची समस्या सोडवली नाही, त्यामुळेच मराठवाड्याचे वाळवंट झालेले आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक सत्ताही काँग्रेसकडेच होती. त्यांनी पाण्याला प्राथमिकता दिली नाही. ७० हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला परंतु सिंचनासाठी पैसा उपलब्ध करुन दिला नाही.

काँग्रेसने १० टक्के अ‍ॅडव्हान्स घेऊन सिंचनाची कामे मंजूर केली. परंतु ती सर्व कामे अर्धवट स्थितीत राहिली. राज्यातील २६ कामांना केंद्र शासनाने मदत केली. त्यात मराठवाड्यातील चार कांमांचा समावेश होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ४० हजार कोटी रुपये सिंचनासाठी देण्यात आले असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

मराठवाड्यातील जायकवाडी कधीच भरले जात नाही. परंतु आता नदीजोड प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. गोदावरीवरील सर्व धरणे भरली जातील, त्यामुळे मराठवाड्यातील पाण्याची समस्या सुटेल, मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल. मी मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.