#Loksabha 2019 : ‘हे’ ३ बडे नेते ठरणार ‘किंग मेकर’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  (विश्लेषण) – एक्झिट पोलमध्ये एनडीएला भरभरून यश मिळणार असल्याचे चित्र असले तरी त्रिशंकू स्थिती निर्माण होणार असा ठाम अंदाज राजकीय निरीक्षकांचा आहे. गतवेळचे एक्झिट पोल पाहता यंदाचे अंदाज जुळेल याची शक्यता कमी आहे. त्यात मागील काही निवडणुकांचे एक्झिट पोल पाहता यंदा एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकीचे ठरतील असा व्होरा राजकीय वर्तुळात असून सत्ता पुन्हा मोदी सरकारकडे येईल मात्र त्यासाठी त्यांना घटक पक्षांची मनधरणी करावी लागेल, असा सूर राजकीय निरीक्षक आळवत आहेत.

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या गुरुवारी लागणार आहेत. त्यानंतर सत्तेची सूत्रे कोणाकडे हे स्पष्ट होणार आहे. पुन्हा नरेंद्र मोदी सरकार यापेक्षा काँग्रेसची ताकद किती वाढते हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. त्यातही गतवेळपेक्षा यंदा मोदी सरकारला सत्ता स्थापनेसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सहजरित्या सत्ता स्थापन करणे यंदा मोदी सरकारसाठी अवघड आहे. काँग्रेसची ‘सीट्स ‘ वाढतील ;पण ते सरकार स्थापन करतील अशी शक्यता कमी आहे. जर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक , वायएसआरसीपीचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी आणि केसीआर या तीन नेत्यांनी जर आघाडीला साथ दिली तर मोदी सरकारचे गणित बिघडू शकते. मात्र हे तीन नेते यंदा सरकार कुणाचेही कि असेना ‘किंग मेकर ‘ ठरणार असा ठाम अंदाज राजकीय निरीक्षकांचा असून ही निवडणूक आहे आणि जनतेने कुणाला कौल दिला , कुणाला थारा नाही दिला या बाबी महत्वाच्या आहेत त्यानुसार अंदाज चुकूही शकतो ;पण भाजपविरोधात आघाडी भक्कम करण्यासाठी जे जोरदार प्रयत्न सुरु आहेत, ते पाहता या तीन नेत्यांवर मोदी सरकारच काय महाआघाडीचे समीकरण अवलंबून राहणार आहे.

आंध्र प्रदेशचे उदाहरण घेतल्यास चंद्राबाबू नायडू हे भाजपविरोधी आघाडी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ;पण त्यांचे प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डी यांनी मात्र आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर रेड्डी यांच्या वायएसआरसीपी पक्षाची भूमिका महत्वाची ठरू शकते. आंध्र प्रदेशला जो विशेष राज्याचा दर्जा देईल त्याच्यासोबत जाऊ असे जगनमोहन रेड्डी यांनी याआधीच स्पष्ट केलेले आहे. त्यात एक्झिट पोलनुसार वायएसआरसीपीला लोकसभेच्या १८ ते २० जागा मिळू शकतात ,तर चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला ४ ते ६ जागांवर समाधान मानावे लागेल. असे असले तरी जगनमोहन रेड्डी हे चंद्राबाबू नायडूंना दणका देऊ शकतात याकडेही राजकीय निरीक्षक लक्ष वेधत आहेत.नवीन पटनाईक, केसीआर यांची भूमिका सत्तास्थापनेसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. त्यामुळे हे तीन नेते कुणाला ‘आसरा’ देतात यावरच मोदी सरकार असो किंवा महाआघाडी यांचे सत्तेचे ‘गणित’ सुकर होणार आहे किंवा मनसुबे ‘पाण्या’त जाणार आहेत.

सध्या या तीन नेत्यांना किंग मेकरच्या नजरेतून पाहिले जात असले तरी उद्या काय निकाल लागतो त्यानुसार रणनीती ठरणार आहे. अंदाज चुकू शकतील ;पण यंदा नामवंत चेहऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागणार तर नवखे निवडून येण्याचा ‘ट्रेण्ड ‘ दिसेल आणि जर मोदी सरकार सत्तेवर पुन्हा विराजमान झाले तर गतवेळसारखी स्थिती नसेल शिवाय हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार नाही असा दावाही राजकीय अभ्यासकांचा आहे.यापार्श्वभूमीवर राजकीय अभ्यासकांचे अनुमान बरोबर ठरते कि चूक हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे आणि मतपेटीत मतदारांनी कुणाला कौल दिला हे आता उद्या जाहीर होणार आहे.

Loading...
You might also like