साक्षी महाराजांचा लोकसभा उमेदवारीवरून युटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीला प्रारंभ होण्यास अवघे काही दिवस राहिले असताना आता भाजपने निवडणुकीसाठी रणनीतीचा वेगळाच पवित्रा आखला आहे. १०९ खासदारांना भाजपने पुन्हा तिकीट न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक खासदार पक्षावर नाराज आहेत. तिकीट कापले जाणाऱ्या खासदारापैकी एक असणारे साक्षी महाराज यांनी देखील भाजपला अल्टिमेट दिला होता.

साक्षी महाराज भाजपचे उत्तर प्रदेशातील उन्नाव मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी आपल्याला तिकीट मिळणार नाही या भीतीने पक्षाला अल्टिमेट दिला होता. मात्र त्यांनी युटर्न घेतला आहे. मी पक्षासोबतच राहणार आहे. उन्नावमधून मलाच लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे आणि उमेदवारी नाही मिळाली तरी मी भाजपचा प्रचार करणार आहे असे साक्षी महाराज म्हणाले आहेत.

आपले तिकिट कापण्याचा धस्का घेतलेल्या साक्षी महाराज यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. आपण उन्नावला येण्याआधी या जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नव्हता आता भाजपचे या मतदारसंघात ६ आमदार आहेत. त्याच प्रमाणे एक विधानपरिषद सदस्य आहे. त्यामुळे आपला पक्षाने विचार नाही केल्यास त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील असे साक्षी महाराज यांनी पत्रात म्हणले होते. मात्र आता त्यांनी मवाळ भूमिका घेऊन पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असे साक्षी महाराज म्हणाले आहेत. दरम्यान साक्षी महाराजांनी वेळोवेळी केलेल्या बेताल वक्तव्याने पक्ष नाराज आहे. त्यामुळे त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.